PM Kisan Yojana ; हे काम करा तरंच मिळेल हप्ता.. नसता कायमचा बंद ; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ (भौतिक पडताळणी) ही प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे किंवा संशयास्पद नोंदींमुळे बंद झाले आहेत, तर काहींचे आगामी हप्ते बंद होण्याची टांगती तलवार आहे. शासनाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सुमारे २.४८ लाखांहून अधिक लाभार्थी या योजनेतून बाद झाले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती लाभ घेणे, जमीन विकल्यानंतरही लाभ सुरू असणे किंवा मयत व्यक्तींच्या नावावर हप्ते जमा होणे अशा बाबी समोर आल्या आहेत. ही गळती रोखण्यासाठी आणि केवळ पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी कृषी विभागातर्फे हे पडताळणी अभियान राबवले जात आहे.
या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना एक विशेष पडताळणी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. या अर्जामध्ये शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, गाव, गट नंबर, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि फार्मर आयडी यांसारखी मूलभूत माहिती भरावी लागते. अर्जात प्रामुख्याने लाभार्थ्याने १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन धारण केली आहे का, याची विचारणा केली जाते. तसेच, लाभार्थी कोणत्याही संवैधानिक पदावर आहे का, तो सरकारी कर्मचारी अथवा १० हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारा निवृत्तीवेतनधारक आहे का, याची स्पष्ट माहिती द्यावी लागते. विशेष म्हणजे, चतुर्थ श्रेणी (Group D) कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले असून त्यांना लाभ घेता येतो. मात्र, आयकर भरणारे शेतकरी किंवा नोंदणीकृत व्यावसायिक (डॉक्टर, वकील, इ.) असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.















