सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यावर ओढवली किडनी विकण्याची वेळ; चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना ; चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील एका शेतकऱ्याला सावकारी कर्जाचा परतावा करण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रोशन सदाशिव कुडे असे या पीडित शेतकऱ्याचे नाव असून, शेतीतील नुकसान आणि दुधाच्या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली. सुरुवातीला घेतलेले केवळ एक लाख रुपयांचे कर्ज चक्रवाढ व्याजामुळे तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचले. हे कर्ज फेडण्यासाठी रोशन यांनी आपली दोन एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील साहित्यही विकले, तरीही सावकारांचा तगादा सुरूच राहिला.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रोशन यांना एका सावकाराने चक्क किडनी विकण्याचा सल्ला दिला. यानंतर एका एजंटच्या माध्यमातून त्यांना सुरुवातीला कोलकात्याला नेण्यात आले, तिथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना कंबोडियामध्ये नेऊन त्यांची एक किडनी काढण्यात आली. ही किडनी आठ लाख रुपयांना विकण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतरही कर्जाचा डोंगर कमी झालेला नाही आणि सावकारांकडून पैशांसाठी सतत धमक्या दिल्या जात असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. रोशन कुडे यांनी ब्रह्मपुरी येथील किशोर बावनकुळे, मनीष काळबांडे यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पीडित शेतकऱ्याने आरोप केला आहे की, या सावकारांची परिसरात एवढी दहशत आहे की त्यांच्या विरोधात कोणीही तक्रार घेण्यास धजावत नाही. वारंवार पोलीस अधीक्षकांकडे दाद मागूनही अद्याप योग्य ती कारवाई झालेली नाही. न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या या शेतकऱ्याने आता कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले असून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी अशा प्रकारे हवालदिल होत असताना प्रशासन काय करत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, या प्रकरणाची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे. किडनी विकणे हा अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर प्रकार असून त्यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या सर्व प्रकारात स्वतःची किडनी गमावलेल्या रोशन कुडे यांना आपली गेलेली मालमत्ता परत मिळणार का आणि त्यांना न्याय कधी मिळणार, हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.








