१००% अनुदानावर भुईमूग बियाणे अर्ज सुरू ; असा करा अर्ज ; राष्ट्रीय खाद्य तेल अभियान २०२५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानावर भुईमूग बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जुलै २०२५ रोजी राज्यामध्ये ५ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीसह खाद्य तेल मिशन अभियान राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती.
या अभियानाद्वारे विविध तेलबिया पिकांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात सोयाबीन, भुईमूग, तीळ, करडे आणि कारळ यांचा समावेश आहे. उन्हाळी हंगामासाठी भुईमूग या पिकाची निवड करण्यात आली असून, या योजनेमुळे तेलबिया पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला १००% अनुदानावर भुईमुगाचे बियाणे दिले जाणार आहे. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त १ हेक्टर (१५० किलो) मर्यादेपर्यंत, तर कमीत कमी २० गुंठे (३० किलो) क्षेत्रासाठी हे अनुदान दिले जाईल. बियाण्याचा दर प्रति किलो ११४ रुपये निश्चित करण्यात आला असून, जास्तीत जास्त १ हेक्टर क्षेत्रासाठी १५० किलोपर्यंत बियाणे पूर्णपणे मोफत उपलब्ध होईल. बियाणे वितरण २० किलो आणि ३० किलोच्या बॅगमध्ये उपलब्धतेनुसार केले जाईल. शेतकऱ्याने अर्ज केलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात त्याला बियाणे दिले जाईल.
या १००% अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे. पोर्टलवर ‘बी बियाणे आणि औषधे’ या बाबीअंतर्गत अर्ज सादर करता येतो. सद्यस्थितीत, भुईमूग या पिकासाठी राज्यातील आठ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, धुळे, पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील शेतकरी या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.








