७५% अनुदानावर शेळी गट योजना ; पहा योजनेची संपूर्ण माहिती ; राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ७२०१ हून अधिक गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा २.०) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. भूमीहीन शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या प्रकल्पाअंतर्गत विविध योजना सुरू आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ७५% अनुदानावर शेळी गट वाटप करण्याची योजना. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना ४ शेळ्या आणि १ बोकड असा एक संपूर्ण गट दिला जातो. यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बलांना उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होण्यास मदत होते.
या योजनेचा लाभ प्रामुख्याने भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा महिला, परितक्त्या महिला आणि घटस्फोटित महिलांना दिला जातो. लाभ घेण्यासाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीची निवड केली जाते आणि त्या व्यक्तीने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा ही मुख्य अट आहे. भूमिहीन असल्याबद्दल तहसीलदारांचे प्रमाणपत्र, तसेच महिलांच्या संबंधित स्थितीबाबत सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. शेळी गटासाठी एकूण ४८,३१९ रुपये खर्च अपेक्षित असून, त्यावर ७५% म्हणजेच ३६,२३९ रुपयांचे भरीव अनुदान दिले जाते.




















