रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज ; महाराष्ट्रात सध्या हवेच्या दाबात बदल होत असून, आज १७ डिसेंबर रोजी राज्यावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. विशेषतः पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडील भागात दाब १०१६ हेप्टापास्कलपर्यंत गेल्याने तिथे थंडीचे प्रमाण अधिक असेल. उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाची थंडी राहील. मात्र, १८ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात १०१६ हेप्टापास्कल दाब वाढणार असल्याने थंडीच्या लाटेची शक्यता आहे. १९ डिसेंबरलाही कडाक्याची थंडी कायम राहील, परंतु २० डिसेंबरपासून हवेचा दाब १०१२ पर्यंत कमी झाल्याने थंडी ओसरून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
2026 चा अंदाज काय ?
पुढील काही महिन्यांचा विचार करता, १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान थंडी हळूहळू कमी होत जाईल आणि ४ मार्चपर्यंत ती टिकून राहील. त्यानंतर मात्र उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होईल. अनेकजण पुढच्या वर्षीच्या पावसाचा अंदाज आत्ताच देऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. डॉ. साबळे हे त्यांच्या स्वविकसित ‘महाराष्ट्र मान्सून मॉडेल’द्वारे शास्त्रीय आकडेवारीच्या आधारे १ जून रोजी अधिकृत पावसाचा अंदाज जाहीर करणार आहेत.
रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन
हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. हरभऱ्याला साधारणपणे ३५ ते ४० व्या दिवशी फुले येताना पहिले पाणी आणि ६० ते ६५ दिवसांनी घाटे भरण्याच्या अवस्थेत दुसरे पाणी द्यावे, ज्यामुळे दाणे चांगले भरतात. गव्हाच्या पेरणीबाबत सल्ला देताना डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले की, आता (१७ डिसेंबरनंतर) गव्हाची पेरणी करणे फायदेशीर ठरणार नाही, कारण उशिरा पेरणीमुळे फुटवे कमी येतात, उंची कमी राहते आणि उत्पादनावर परिणाम होतो. तुरीच्या पिकावर थंडीचा फारसा परिणाम होणार नसला तरी शेंगा पोखरणारी अळी रोखण्यासाठी योग्य बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
कृषी सल्ला आणि फळबागांचे व्यवस्थापन
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या अनेक भागात आंब्याला मोहर येत असून त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. थंडी जास्त असताना फळबागांमध्ये शेकोट्या पेटवून तापमान नियंत्रित ठेवावे. तसेच कुक्कुटपालन करणाऱ्यांनी शेडमध्ये बल्ब लावून उष्णता वाढवावी आणि जनावरांना बंदिस्त शेडमध्ये बांधून त्यांचे थंडीपासून संरक्षण करावे. कोकणातील सध्याचे तापमान भुईमूग आणि मोहरीच्या पेरणीसाठी अत्यंत पोषक आहे, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी ही कामे त्वरित उरकून घ्यावीत.