निर्यात वाढली-कांद्याच्या भावात होतेय वाढ, आता कांदा विकावा कि थांबावे ? शेतकरी मित्रांनो, सध्या कांद्याच्या बाजारभावामध्ये चांगली सुधारणा झालेली दिसून येत आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात “आता विकावा की थांबावे” असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वर्षभर उन्हाळी कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे झालेले मोठे नुकसान या दरवाढीमुळे पूर्णपणे भरून निघू शकत नाही. मात्र, सध्या भावात सुधारणा होण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत: एक म्हणजे, महाराष्ट्रात नवीन कांद्याचे पीक पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने त्याचे उत्पादन घटले आहे आणि बाजारात आवक (सप्लाय) कमी झाली आहे. दुसरे म्हणजे, जुना कांदा संपत येणे आणि नवीन कांदा बाजारात येणे या दरवर्षीच्या संक्रमण काळात भावामध्ये सुधारणा दिसून येते.
सध्या नवीन कांद्याला गुणवत्तेनुसार भाव मिळत आहेत. उत्तम प्रतीचा (बियाणे क्वालिटी) कांदा ₹2000 ते ₹4000 प्रति क्विंटल दराने विकला जात आहे, तर कोरड्या मालाला ₹1500 ते ₹2000 प्रति क्विंटल दर मिळत आहे. याउलट, ओला, मिक्स किंवा कोम आलेला माल ₹100 ते ₹1000 प्रति क्विंटल अशा कमी दरात विकला जात आहे. शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी की, जर ओला माल जास्त प्रमाणात बाजारात आला, तर तो संपूर्ण बाजाराची सरासरी खाली आणतो. त्यामुळे आपला कांदा व्यवस्थित सुकवून आणि वाळवूनच बाजारात आणावा, जेणेकरून तुम्हाला निश्चितच चांगला दर मिळेल.




















