डॉ. रामचंद्र साबळे यांचा हवामान ; थंडी वाढनार, पुन्हा पावसाची शक्यता ?
डॉ. रामचंद्र साबळे यांनी भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीवर आधारित हवामान अंदाज दिला आहे. सध्या महाराष्ट्रावर हवेचा दाब अधिक असल्याने किमान तापमानात घसरण होऊन थंडीचे प्रमाण वाढणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवेल, तर मध्य व दक्षिण भागांमध्ये ही तीव्रता तुलनेने कमी असेल. विदर्भासह उत्तर भारतात थंडीचे प्रमाण अधिक वाढेल. या काळात हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता आहे, मात्र सध्या तरी पावसाची कोणतीही शक्यता नाही. दुपारी थंड आणि कोरडे हवामान राहील.
हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राचे तापमान सध्या समान (२९ अंश सेल्सिअस) आहे. जेव्हा समुद्राचे तापमान असे स्थिर व समान असते, तेव्हा हवामानात मोठे बदल घडत नाहीत. त्यामुळे या काळात केवळ थंडीची तीव्रता जाणवेल, याव्यतिरिक्त इतर कोणतेही मोठे हवामानाचे बदल होण्याची शक्यता नाही.
तसेच प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान पाहता, ‘ला नीना’चा प्रभाव सध्या तरी जाणवत नाही. हवामान स्थिरतेकडे वाटचाल करत असून, पुढील काळात थंडी चांगली राहील आणि यंदाचा उन्हाळा कडक राहील, असा अंदाज डॉ. साबळे यांनी वर्तवला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी महत्त्वाचा कृषी सल्ला दिला आहे. सध्या थंडीमुळे ऊस उगवण्यास विलंब होऊ शकतो, कारण उगवणीसाठी तापमान हा घटक फार महत्त्वाचा आहे. अशा हवामानात ऊस उगवण्यासाठी २१ ते २५ दिवसांचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा.
थंडीमुळे तूर पिकाचे कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही, कारण थंडीची तीव्रता अजून फार वाढलेली नाही. तीळ पेरणीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, खरीप, रब्बी आणि उन्हाळी तिन्ही हंगामात तीळ पेरता येते. आता पेरणी करायची असल्यास १५ डिसेंबरपर्यंत करावी, अन्यथा १५ फेब्रुवारीनंतर केव्हाही पेरणी करता येईल.