माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे की, पुढील १५ दिवस ते दीड महिना म्हणजेच जानेवारी अखेरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची कोणतीही शक्यता नाही. सध्या ‘ला-निना’ सक्रिय झाला असला तरी तो अतिशय कमकुवत अवस्थेत आहे. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा फारच कमी प्रमाणात खालावल्याने त्याचा महाराष्ट्रावर पाऊस पडण्यासारखा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या धास्तीपोटी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही; उलट हवामान कोरडे आणि स्वच्छ राहणार आहे.
थंडीचा मुक्काम वाढणार आणि थंडीच्या लाटांची शक्यता
यंदाची थंडी ही प्रामुख्याने ‘निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल’ (IOD) मुळे अधिक तीव्र जाणवत आहे. बंगालच्या उपसागराचे तापमान अरबी समुद्रापेक्षा जास्त असल्याने पावसाच्या सिस्टिम्स दक्षिणेकडेच मर्यादित राहिल्या, ज्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले नाही आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे अडथळ्याविना पोहोचले. खुळे सरांच्या अंदाजानुसार, ही थंडी ३१ डिसेंबरपर्यंत (भागवत एकादशी) टिकून राहील. तसेच, जानेवारी महिन्यात राज्यात थंडीच्या लाटा येण्याची शक्यता अधिक असून थंडीचा हा कडाका १५ फेब्रुवारीपर्यंत कमी-अधिक प्रमाणात जाणवत राहील.















