चक्रीवादळं आणि अतीव्रुष्टीच्या घटना वाढनार, विदर्भ मराठवाडा अलर्टवर..
हवामानतज्ज्ञ किरण वाघमोडे यांनी चिराग धारा आणि त्यांच्या टीमने प्रकाशित केलेल्या एका महत्त्वपूर्ण रिसर्च पेपरवर आधारित माहिती दिली आहे. या अहवालात महाराष्ट्रासह भारतातील हवामानातील वाढते बदल आणि अतिवृष्टी, तसेच चक्रीवादळांच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभागामध्ये अतिवृष्टीच्या घटना वाढणार असल्याची शक्यता या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
चक्रीवादळांच्या बाबतीत झालेल्या बदलांनुसार, १९८२ ते २००० या काळात अरबी समुद्रात चक्रीवादळे कमी प्रमाणात तयार होत असत. मात्र, २००१ ते २०१९ या काळात त्यांच्या निर्मितीची शक्यता ५२ टक्क्यांनी वाढली आहे. ही चक्रीवादळे आता मान्सूनपूर्वीच्या काळात तयार होत असून त्यांची तीव्रताही वाढत आहे.
याउलट, बंगालच्या उपसागरात मात्र तुलनेने चक्रीवादळे कमी होत आहेत. तापमानाचा विचार केल्यास, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्येक दशकात ‘गरम दिवसां’मध्ये वाढ होताना दिसत आहे, तसेच रात्रीचे तापमानही वाढू लागले आहे, जो हवामानातील बदलांचा एक स्पष्ट संकेत आहे.
अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ हा या अहवालाचा मुख्य निष्कर्ष आहे. १५० मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याच्या घटना परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हळूहळू वाढत आहेत. यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट आणि नाशिक घाट यांसारख्या भागांमध्येही अतिवृष्टी वाढत आहे. याउलट, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मात्र पूर्वीच्या तुलनेत अशा घटना कमी होत आहेत.
विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीच्या घटना वाढत असल्या तरी, या विभागातील एकूण पाऊसमानाचा कल मात्र कमी होण्याकडे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याउलट पुणे घाट, नाशिक घाट आणि सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागांमध्ये जून ते सप्टेंबर या काळात होणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत आहे. देशातील उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी होण्याचा कल दिसून येत आहे. या संशोधन अहवालावरून महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या घटना काही प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट होते.