आधारभूत किंमत धान खरेदी योजना २०२५-२६: नोंदणीसाठी मुदतवाढ ; महाराष्ट्र राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ साठी सुरू असलेल्या धान खरेदी नोंदणीला आता राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२५ पर्यंत होती, परंतु आता ती वाढवून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे, त्यांना आता आपल्या हक्काच्या हमीभावाने धान विक्री करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची ही शेवटची संधी उपलब्ध झाली आहे.
या योजनेअंतर्गत नोंदणी करणे केवळ धान विक्रीसाठीच नाही, तर भविष्यातील फायद्यांसाठीही अनिवार्य आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्यामुळे सरकारकडून धानासाठी विशेष बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे. जर शासनाकडून धानाचा बोनस दिला गेला, तर त्यासाठी केवळ त्याच शेतकऱ्यांना पात्र धरले जाईल ज्यांची आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत अधिकृत नोंदणी झालेली असेल. त्यामुळे हमीभावाचा लाभ आणि संभाव्य बोनस या दोन्ही गोष्टींसाठी शेतकऱ्यांनी ही नोंदणी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.















